पाटणसारख्या ग्रामीण भागात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कोयना एज्युकेशन संस्थेने उभारून येथील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज मुळे रोजगाराच्या संधी मिळतील. या संस्थेतील विद्यार्थी निश्चितच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करा. उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आज झगडून कष्ट करा ही ताकद ठेवा, असे आवाहन पूर्णब्रम्हच्या व्यवस्थापकीय संचालिका व प्रसिध्द उद्योजिका सौ. जयंती कठाळे यांनी केले. कोयना एज्युकेशन सोसायटी पाटणचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण या नवीन विद्याशाखेचा उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, डॉ. प्रल्हाद चव्हाण, संचालक याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण, प्राचार्य एस. डी. पवार, प्राचार्य सावंतसर, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव क्षीरसागर, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ऍड. अविनाश जानुगडे, पाटण अर्बन बॅंकेचे चेअरमन जयसिंग राजेमहाडीक, व्हाईस चेअरमन रविंद्र ताटे, साकर्डीचे राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम, निवास शिंदे, सुहास देशमुख, पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन सौ. रेखाताई पाटील, कोयना कृषकचे चेअरमन नारायण सत्रे, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. मंगलताई कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. जयंती कठाळे पुढे म्हणाल्या, मराठी पदार्थ अत्याधुनिक पध्दतीने आंतरराष्ट्रीयस्तरावर घेवून जाण्यासाठीचे सर्व शिक्षण या इन्स्टिट्यूटमधून घ्या. 2.1 इंडीयन डॉलरचा व्यवसाय इंडीयात होतो तो फक्त फूड इंडस्ट्रीजचा. त्यातील 70 टक्के व्यवसाय हा महाराष्ट्रात होतो. येथील लोकांनी जे काम केले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. या संस्थेत केवळइ थल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण द्या.भारत वाढला तर आपण वाढू असा विचार करूनच शिक्षण घ्या. मराठी पध्दतीनेही पदार्थ बनवायला शिकवा. महाराष्ट्रात प्रगल्भता आहे ती मुलांना शिकवा. या हॉटेल मॅनेजमेंटमधून प्रशिक्षण घेवून विद्यार्थी बाहेर पडतील तेव्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून पाटणचे नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कोयना शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज पत्र्याच्या शेडमध्ये भरत होते. सोपानकाका, अमरदादा यांना नेहमी प्रेरणा देण्याचे काम आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून झाले आहे. शरदचंद्रजी पवारसाहेब हे मुख्यमंत्री असताना विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून अमरदादा, काकांच्या चिकाटीने जागा संस्थेला मिळाली. त्यानंतर संस्थेने भरारी घेतली आणि आज आपण वातानुकुलित सभागृहात कार्यक्रम घेतोय ही कल्पना देखील आम्ही कधी केली नव्हती. माझ्या तालुक्यातील तरूण मुंबई, पुणे येथे जावून माथाडी कामगार होवू नये यासाठी पर्यटनाचा व्यवसाय करण्यासाठी चालना देण्याचे काम माजी मंत्री पाटणकर यांनी केले. तालुक्यात पर्यटनवाढीसाठी कोयनेत पर्यटन केंद्र आणले. पतंगराव कदम यांनी पाचगणीची बोर्डींगची शाळा कोयनानगरला व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी कोयनेत जागाही घेतली होती मात्र काहींनी त्याला विरोध केला. विक्रमसिंह पाटणकर यांनी तालुक्यासह कोयनेत पर्यटन व हॉटेलींगसाठी मोठे योगदान दिले आहे. माजी मंत्री पाटणकर यांच्या संकल्पनेतूनच पाटण येथे हॉटेल मॅनेजमेंट सुरू झाले असून याचा फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना होवून रोजगार निर्मिती नक्कीच होईल. हॉटेल व टुरिझम इंडस्ट्रीजशिवाय सध्या पर्याय नाही. कोयना शिक्षण संस्थेने हॉटेल व्यवसाय कोर्स सुरू करून धाडसाचे पाऊल उचलले आहे. या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना देशात, परदेशात नाकरीची संधी नक्कीच उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटणचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण या नवीन विद्याशाखेच्या इमारतीचे उद्घाटन सौ. जयंती कठाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. संचालक संजीव चव्हाण यांनी प्रास्ताविकात हॉटेल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटची माहिती दिली. संचालक याज्ञसेन पाटणकर यांनी स्वागत केले. जाधव मॅडम यांनी सुत्रसंचालन केले. हॉटेल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचे प्राचार्य सावंत सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास धैर्यशील पाटणकर, दीपकसिंह पाटणकर, पी. एल. माने यांच्यासह पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पालक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.